भाजप आमदाराकडून जमावबंदीच्या आदेशाचा भंग, FIR दाखल

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी बुधवारी (दि.18) पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याजवळच्या आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करून टोलनाका बंद पाडला होता. शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जमावबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह 80 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी शिवेंद्रराजे यांनी प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. पंधरा दिवसाच्या आत सर्व प्रकारच्या सुविधा पुरवा, खड्डे बुजवा नाहीतर टोल बंद पाडू असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने शिवेंद्रराजे आक्रमक झाले होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आनेवाडी टोल नाका येथे आंदोलन करत टोलनाका बंद पाडला होता. तसेच येत्या काळात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर खळ्ळखट्याक आंदोलन होईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. याप्रकरणी त्यांच्याविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्याच्या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. त्यानुसार आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखाली आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले. सातारा पुणे महामार्गाबाबत टोल नाक्याच्या आंदोलना दरम्यान त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसबोत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी महिनाअखेरपर्यंत सातारा -पुणे रस्त्यावरील मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन घेतले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/