गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, भाजपाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीसाला मारहाण प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी शुक्रवारी (दि. 16) पत्रकार परिषदेत केली. एरवी संविधानाचा बाऊ करून राजकारण करणाऱ्या यशोमतींना पोलिसाला मारताना संविधानाचा विसर कसा पडला. अशा दोषी ठरवलेल्या व्यक्तीकडून समाजातील पीडितांना न्याय मिळण्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरणार असल्याचे कुळकर्णी म्हणाले.

यशोमतीना अमरावती जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांनी जे काही कृत्य केले तो म्हणजे सत्तेचा माज होता. आठ वर्षापूर्वी राज्यात काँग्रेसचे शासन असताना वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावर म्हणजे वनवे वर आपली कार अडवली म्हणून उल्हास रौराळे या पोलिस कर्मचार्याला मारहाण केली होती. खाकीवर हात उगारल्या प्रकरणी यशोमतीताईंना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भाजपा नेत्यांवर तोंडसुख घेताना त्या वारंवार मारण्याची भाषा बोलतात.

मध्यंतरी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना राडा करण्याचा जाहीर मंत्र दिला होता. एक वेळ राजकीय आंदोलनात भावनेच्या भरात हातून गुन्हा घडतो, ते ही एकवेळ आपण समजू शकतो. पण कर्तव्याची चाड बाळगणाऱ्या व आग्रही पोलिसाच्या थोबाडीत हाणणे, कितपत योग्य आहे ? असाही प्रश्न कुळकर्णी यांनी विचारला.