विधानसभा 2019 : युतीच्या घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची संधी आहे. मात्र असे असूनही युतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. रविवारी अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. याच दौऱ्यात युतीची घोषणा केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर आता पितृपंधरवडा संपला की, घटस्थापनेचा मुहूर्त साधत युतीची घोषणा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

शिवसेनेचा फॉर्म्युला भाजपला अमान्यच
लोकसभेमध्ये युतीसाठी 50-50 फॉर्म्युला वापरण्यात आला होता तोच विधानसभेवेळीही वापरण्यात येणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेचा 50-50 चा फॉर्म्युला हा भाजपला अद्याप अमान्यच आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा हा अद्याप कायम आहे. शिवसेना 126 जागांवर ठाम आहे तर भाजप 120 पैकी एकही जागा देण्यासाठी तयार नाही आहे. त्यामुळे शिवसेनेला कमी जागांवर समाधान मानावं लागणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजप शिवसेना जागावाटपाबद्दल आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. युती होणार हे नक्की असलं तरी जागावाटपाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

2014 साली घटस्थापनेच्या दिवशीच युती तुटली होती. यावेळी मात्र एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, अशी युतीच्या नेत्यांची भूमिका आहे. घटस्थापनेला युतीची घोषणा केल्यानंतर पुढील दोन-चार दिवसांत टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर केल्या जातील.

Visit : Policenama.com