भाजप-शिवसेनेला मोठा धक्का ! ‘या’ 5 विद्यमान आणि बड्या मंत्र्यांचा पराभव, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचा बालेकिल्ला समजणाऱ्या मतदारसंघामध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत 220 च्या पुढे जागा मिळतील असा दावा करणाऱ्या भाजपच्या विद्यमान मंत्र्यांना मतदारांनी नाकारले. भाजपच्या पाच विद्यमान मंत्र्यांचा पराभव झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, राम शिंदे, विजय शिवतारे, अर्जुन खोतकर, बाळा भेगडे यांचा पराभव झाला आहे.

पंकजा मुंडे :
विधानसभा निवडणुकांचा सगळ्यात मोठा हायव्होलटेज निकाल समोर आला आहे. सगळ्यांचं लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा निवडणूकांमधून राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत तर भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा तब्बल 30 हजार मतांनी पराभव झाला आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भावनिक प्रचार करण्यात आला. याचा फायदा पंकजा मुंडे यांना होईल असे वाटत होते. मात्र, मतदारांनी पंकजा मुंडे यांना नाकारत धनंजय मुंडे यांना विजयी केले.

राम शिंदे :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात कर्जत आणि जामखेड या मतदार संघात अटीतटीची लढत झाली. प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. रोहित पवार यांच्या विजयासाठी पवार कुटुंबियांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

विजय शिवतारे :
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याच दरम्यान अजित पवार यांनी बारामतीच्या सांगता सभेत बघतोट विजय शिवतारे कसा निवडू येतो ते, असा इशाराच दिला होता. आजच्या निकालानंतर अजित पवारांनी बोलल्याप्रमाणे करून दाखविले आहे. आज लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात विद्यमान मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाला असून संजय जगताप यांनी त्यांचा पराभव केला.

बाळा भेगडे :

मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता अखेरीस संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेडगे यांचा पराभव केला आहे. राज्यात इतर महत्वपूर्ण लढतींप्रमाणे या मतदारसंघातल्या लढतीकडे पाहिलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात ही लढत बऱ्याच प्रमाणात एकतर्फी झाली. भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत सुनील शेळके यांनी विजय खेचून आणला आहे.

अर्जुन खोतकर :
पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री आणि जालना विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये लक्षवेधी लढत झाली. यापूर्वी या दोघांमध्ये तीन लढती झालेल्या असून त्यापैकी दोन वेळेस खोतकर निवडून आलेले आहेत.२०१४-१५ मध्ये चौथ्यांदा आमदार होऊन ते पशुसंवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री झाले. २०१४ मध्ये खोतकरांचा फक्त २९६ मतांनी विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत खोतकर यांचा 5 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला आहे.

Visit : Policenama.com