‘लिक झालेल्या गोस्वामींच्या WhatsApp चॅटबद्दल भाजपने स्पष्टीकरण द्यावे’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : समाजमाध्यमांमध्ये BARC चे ( ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल) माजी सीईओ पार्थो दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे WhatsApp वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक असून त्यातून टीआरपी (TRP) घोटाळ्यामध्ये भाजप आणि आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भात भाजप अन् मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे,” अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघडकीस आणला असून त्यामध्ये रिपब्लिक चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर BARC चे माजी सीईओ पार्थो दास गुप्ता यांना अटकही झाली आहे. सदर टीआरपी घोटाळा दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून झाला असून त्याकरता उत्तर प्रदेशमध्ये वेगळी केस नोंदवण्याचा प्रकार देखील घडला. हा सगळा आटापिटा आपले कारस्थान उघड पडेल या हेतूने होता, हे चॅट वरून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

सदर चॅट्स मधून रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख आपला पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय आणि AS यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर केंद्र सरकारशी संबंध असल्याने हे दोन्ही व्यक्ती रिपब्लिक चॅनलच्या टीआरपीमध्ये वाढ होण्याची व्यूव्हरचना तयार करत होते, हे ही दिसून येते. यामध्ये AS नावाची व्यक्ती कोण आहे, हे भाजपने स्पष्ट करावे. तसेच रिपब्लिक चॅनलबद्दल माहिती जनसंपर्क मंत्रालयाला मिळालेली तक्रार बाजूला ठेवली आहे, असे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी सांगितले, असे यात नमूद केले आहे. याचाच अर्थ रिपब्लिक चॅनलला वाचविण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत होते हे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.

TRP घोटाळ्यात केंद्र सरकारचा काय संबंध ?
या कालावधीमध्ये प्रेक्षकांची गोपनीय स्वरुपाची माहिती उघड झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. टीआरपी घोटाळ्यामध्ये केंद्र सरकारचा काय संबंध आहे? किरीट सोमय्या व राम कदमांसहित भाजपाचे नेते रिपब्लिक चॅनेलच्या प्रमुखाच्या पाठीशी का उभे राहिले? आणि या कारस्थानामध्ये भाजपची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या मूळाशी पोहचतीलाच अशी अपेक्षा यावेळी सावंत यांनी व्यक्त केली आहे.