गोव्यात भाजपामध्ये बंडाचे संकेत ?

पणजी : वृत्तसंस्था – गोव्यातील मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना सत्ताधारी भाजपा उमेदवारी देण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे  गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांना हा निर्णय पटलेला नसून त्यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. सोपटे आणि अन्य एका काँग्रेस आमदाराने गोवा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेसला धक्का बसला होता. परंतु आता भाजपामध्ये नाराजी आहे. गोव्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
मला गृहित धरणे भाजपाने बंद करावे असे पार्सेकर म्हणाले. दोन दिवसांपूर्वीच गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी पार्सेकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मांद्रेममध्ये सोपटे यांनी पार्सेकरांचा पराभव केला होता. मांद्रेम विधानसभा पोटनिवडणुकीआधी काँग्रेसने भाजपाविरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
मी माझे पत्ते आता उघड करणार नाही. मी पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाही असे अनेकांना वाटते. पण मला पक्षाने गृहित धरु नये असा इशारा त्यांनी दिला आहे. गोवा भाजपा अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोपटेंना पक्षात प्रवेश देताना आपल्याला विश्वासात घेतले नाही म्हणून पार्सेकरांनी नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाचे म्हणजे मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला आहे. ते मुख्यमंत्रीपदी कायम असले तरी राजकारणात सक्रीय नाहीत. पर्रिकर सध्या आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहेत.