राहुल गांधी यांच्या ’हुकुमशाह’च्या वक्तव्यावर भाजपाचा पलटवार, जावडेकर म्हणाले – ‘तुम्हाला समजणार नाही, M म्हणजे महात्मा गांधी सुद्धा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानी एका ट्विट मध्ये म्हटले की, जगातील अनेक हुकुमशाहांची नावे ’एम’ वरून का सुरू होतात? त्यांनी उदाहरणासाठी मार्कोस, मुसोलिनी, मिलोसेविक, हुस्नी मुबारक, मोबुतू, मिकोमबेरो, मुशर्रफ यांची नावे सुद्धा दिली. राहुल यांच्या या हल्ल्यानंतर भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून म्हटले की, ’एम वरून मोहनदास सुद्धा होते – साबरमतीचे संत, बापू – द ग्रेटेस्ट अपोस्टल ऑफ ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स. भारताच्या मातीची वेगळीच गोष्ट आहे, ही हुकुमशाही नाही बुद्ध आणि महावीरांची वसुधा आहे. जाऊद्या तुम्हाला नाही समजणार राहुलजी.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, ’अनभिज्ञ राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, बहुतांश हुकुमशाहांची नावे एम ने सुरू होतात. मी त्यांना विचारतो की, मोहनदास करमचंद गांधी अहिंसेचे पुजारी होते जे संपूर्ण जगात ओळखले जातात. त्यांचे नाव सुद्धा एम ने सुरू होते. त्यांच्याबाबत तुमचे मत काय आहे?

तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर यूजर्सने देखील विविध प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, एम वरून मनमोहन सिंह आणि मोतीलाल नेहरूंचे नावही सुरू होते.