जातप्रमाणपत्राचं प्रकरण : सोलापूरचे भाजप खासदार जयसिध्देश्वर महाराजांना कोणत्याही क्षणी अटक ?

सोलापूर : वृत्तसंस्था – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने खासदारांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने जयसिद्धेश्वर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी निवडणूक लढवताना आयोगाकडे दाखल केलेले जातप्रमाणपत्र बनवाट असल्याचे समोर आलं होतं. जात पडताळणी समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल दिला होता.

भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने 156/3 प्रमाणे पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जयसिद्धेश्वर यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण ?
लोकसभा निवडणुकीत दिग्गजांचा पराभव करून लिंगायत समजाचे गुरु असणाऱ्या जयसिद्धेश्वर महाराज यांनी विजय मिळवला होता. मात्र, त्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. पण हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती.