भाजपला मोठा धक्का ! सोलापूरचे खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांच्याविरोधात FIR

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप खासदार महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी महास्वामी यांच्या विरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने १५६/३ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बझार पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला होता. महास्वामी यांनी आपल्या उमेदवारी अर्जाबरोबर बेडा जंगम जातीचा दाखला सादर केला होता. मात्र हे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली होती. जात पडताळणी समितीने जय सिद्धेश्वर महास्वामी यांना मुळ जात प्रमाणपत्र सादर करण्याचा आदेश दिला होता.

पण, त्यांना मुळ जात प्रमाणपत्र सादर करता आले नाही. त्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला. त्यानंतर महास्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून तेथे त्यांनी प्रवासात मुळ जात प्रमाणपत्र हरविले असे सांगितले. उच्च न्यायालय काय निर्णय देणार यावर त्यांच्या खासदारकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.