फेसबुकवरील जाहिरातींवर भाजपने केला करोडोंचा खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जस – जशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहे. तस – तसा राजकीय पक्षांचा जाहिरातबाजीकडे कल वाढत असताना दिसत आहे . साेशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असताना सोशल मीडियातील जाहिरातबाजीवर भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक खर्च केला असल्याचे समजत आहे.

फेसबुकच्या फेब्रुवारी महिन्याचा डेटा समोर आला आहे. त्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. फेब्रुवारीच्या डेटानुसार, भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्याने राजकीय जाहिरातबाजीसाठी सर्वाधिक खर्च केला आहे. सोशल मिडीयावरील जाहिरातबाजीमध्ये व्यक्ती, खासदार, आमदार, संघटना, पक्षाचे नेते यांचा समावेश आहे. अद्याप आचारसंहिता लागू झालेली नाही अशात राजकीय जाहिरातबाजीला मात्र चांगलाच वेग आलेला दिसत आहे. परंतु जेव्हा आचारसंहिता लागू केली जाईल तेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या जाहिरातबाजीला निवडणुक आयोगाकडून चाप बसेल.

समोर आलेल्या डेटानुसार, फेसबुकवर भाजपाने फेब्रुवारी महिन्यात,  2 करोड 37 लाख एवढी रक्कम खर्च केली आहे तर, काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी 10 लाख 60 हजार रुपये खर्च केले आहेत. तर प्रदेशिक पक्षही जाहिरातबाजीबाबत पिछाडीवर नाहीत.  त्यांनीही  फेसबुकवरील जाहिरातबाजीसाठी 19 लाख 80 हजार खर्च केल्याची आकडेवारी  समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रादेशिक पक्षांच्या यादीत बिजू जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तेलगु देसम पार्टी, वाईएसआर काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांचा समावेश आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. 7 फेब्रुवारी ते 2 मार्च 2019 या दरम्यानचा हा फेसबुक डेटा आहे.

समोर आलेल्या फेसबुकच्या डेटावरून,  MY GOV सारखे सरकारी विभाग आणि डिजिटल इंडिया अशा प्रचारासाठी फेसुबकवर 35 लाखांहून अधिक खर्च करण्यात आल्याचे समजत आहे. याशिवाय भाजपाने  “भारत के मन की बात” या पेजच्या माध्यमातून जाहिरात दिली यासाठी 1 करोड रूपये खर्च करण्यात आला. तसेच ‘नेशन विथ नमो’ या पेजच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जाहिरातींसाठी 60 लाख रूपये मोजावे लागले आहेत असेही समोर आले आहे.

2019 च्या निवडणुकीसाठी फेसबुकने बनवले कडक नियम

लोकसभा निवडणूक 2019 साठी फेसबुकने मॉडेल कोड ऑफ कन्डट या अंतर्गत राजकीय जाहिरताबाजीसाठी कठोर नियम बनवले आहेत. भारतातील राजकीय पक्षांना या नियमाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. पक्षाला देणगी कुठून मिळाली याचे विवरणही दाखवणे बंधनकारक असणार आहे.