सिंचन घोटाळा ! क्लीन चिटबद्दल भाजपच्या ‘या’ नेत्यानं अजित पवारांचं केलं अभिनंदन, नंतर केलं ट्विट ‘डिलिट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेली सिंचन प्रकल्पाच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहे, असे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी एका पत्रकाव्दारे दिले आहेत. यानंतर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचं अभिनंदन करणारे ट्विट केले होते.
Tweet
सिंचन प्रकरणांची चौकशी बंद करण्याबाबत पत्रक ट्विटवर शेअर करत ‘अभिनंदन अजित पवारजी’ असे म्हणत अवधूत वाघ यांनी अजित पवारांचे अभिनंदन केले होते. मात्र, नंतर काही क्षणातच अवधूत वाघ यांनी हे ट्विट डिलीट केले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपला साथ देणं आणि त्यानंतर 48 तासात त्यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळणे, यावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची फाइल बंद करण्याबाबतच्या अंतिम चौकशी अहवालाचे अवलोकन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकांनी केले आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास सरकारने काही नियम केल्यास किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे.

Visit : Policenama.com