‘नाथाभाऊंना राष्ट्रवादी लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पहावं लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) यांनी राष्ट्रवादी आणि एकनाथ खडसेंवर (Eknath Khadse) खोचक टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी याकडे आमचंही लक्ष असेल असं पाटील म्हणाले आहेत. भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर त्यावर काहीतरी मार्ग काढता आला असता. त्यासाठी पक्ष सोडण्याची गरज नव्हती असं म्हणत पाटलांनी खडसेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “नाथाभाऊंवर जो अन्याय झाला त्यावर त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली होती. नाथाभाऊंना पक्षानंही खूप काही दिलं. त्यामुळं त्यांच्यावर जो अन्या झाला त्यावर काही ना काही तोडगा निघाला असता. आता जयंत पाटील (Jayant Patil) काय देतात ते बघूया” असं म्हणत त्यांनी जयंत पाटलांवरही टीका केली.

चंद्रकांत पाटील पुढं म्हणाले, “2 वाजताचा प्रवेश 4 वाजेपर्यंत का लांबला हे जयंत पाटलांनी सांगावं. तुमच्याकडेही अजून त्यांना काय द्यायचं हे ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ अशावर शेवटी नाथाभाऊ बळे बळे नरिमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यात लिमलेटच्या गोळीनंही समाधान होतं आणि कॅडबरीनंही समाधान होतं. त्यामुळं आता त्यांना ते लिमलेटची गोळी देतात की, कॅडबरी देतात ? आणि त्यावर मनापासून समाधानी नाथाभाऊ होतात की, आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्यावर समाधानी आहे असं म्हणतात ते पहावं लागेल.” असंही ते म्हणाले.

इतकंच नाही तर एकट्या दवेंद्रजींना नाथाभाऊंनी टारगेट करणं बरोबर नाही. भाजपचे निर्णय हे सामूहिक असतात असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी सांगितलं.

You might also like