‘स्वतःला CM अन् मुलाला मंत्री बनविण्यासाठी युती तोडून उध्दव ठाकरेंनी सरकार बनवलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबईच्या नेरुळ येथे भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरु आहे. यात विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष पुन्हा एकदा संघटनात्मक बांधणी करणार असून या कार्यक्रमाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सूत्र हाती घेतली आहेत. त्यांनी आपल्या भाषणात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हटले की, हे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही, आपसातील भांडणामुळे हे सरकार लवकरच कोसळेल असे देखील ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, माझ्यासारख्या सामान्य माणसाची, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या माणसाची दुसऱ्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली असे म्हणून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, १९८५ नंतर पहिल्यांदाच भाजपच्या रूपाने एखाद्या पक्षाला पुन्हा एकदा १०० जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे हा जनादेश युतीला मिळाला होता. परंतु आपल्याला बाजूला सारून विरोधक एकत्र आले आणि युती तोडून सरकार स्थापन केलं. राज्यात सर्वाधिक मतं भाजपाला मिळाली असून तब्बल १ कोटी ४२ लाख इतकी मतं मिळाली. लोकांची प्रचंड इच्छाशक्ती होती की भाजपाने सत्ता स्थापन करावी. परंतु शिवसेनेनं ऐनवेळी दगाबाजी करत आपला खरा चेहरा दाखवून दिला, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या बाबतीत ते पुढे म्हणाले की, शिवसेनेला केवळ देवेंद्र फडणवीस यांचा फोन घ्यायला वेळ नव्हता, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी चर्चा करायला वेळच वेळ होता असा टोमणा देखील त्यांनी मारला. भाजपासोबत आम्हाला राहायचं नव्हतं आणि हे आधीपासूनच आम्ही ठरवलं होतं असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते, मग तुम्ही युती का केली? स्वतःला मुख्यमंत्री आणि मुलाला मंत्री करण्यासाठी सरकार केलं गेलं का? अशी जहरी टीका देखील त्यांनी शिवसेनेवर केली.

तसेच चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, सावरकरांना समलैंगिक म्हटलं जातं तरीही शिवसेना सहन करते. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा पुतळा तोडण्यात आला त्याबद्दल देखील शिवसेना शांतच होती. त्यामुळे हे सरकार पाडण्यासाठी आपण काही करायचं कारण नाही. आपण एक विरोधक म्हणून भूमिका घ्यायची आणि काम करत राहायचे. जे उद्धव ठाकरे २५ आणि ५० हजार प्रति हेक्टरी मदत करण्याच्या गोष्टी करत होते, त्यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत एक शब्द देखील बाहेर काढला नाही. नंतर फसवी कर्जमाफी घोषित केली, परंतु २०१९-२० च्या कर्जमाफीबद्दल एक शब्द देखील काढला नाही.

सध्या राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, सीएएच्या अंमलबजावणी देखील करण्यात येत नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं यांनी १५ वर्षात काही केलं नाही. आम्ही शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या चौकशीला घाबरत नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवली मग त्याला आणखी उशीर लागणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. तसेच ते म्हणाले की नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत विशेष लक्ष घालून विजयी झाले पाहिजे, कारण सगळीकडे सगळे विरोधक एकवटले असून आपण एकटे आहोत अशी परिस्थिती सध्याला आहे. त्यामुळे आपल्याला विजय मिळाला पाहिजे असे देखील ते म्हणाले.