मुख्यमंत्री वडीलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी झालात का ? ‘उद्धव ठाकरें’च्या कार्यक्षमतेवर भाजपच्या बड्या नेत्याचे ‘प्रश्नचिन्ह’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यावर भाजपशी फारकत घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर चूल मांडणाऱ्या शिवसेनेला भाजपकडून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

साखरे संदर्भातील एका कार्यक्रमात हे म्हणतात की, साखरेचा विषय आला की, मी जयंत पाटलांकडे पाहतो. महसूलचा विषय आला की, मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता. केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का ? आणि राज्याला असा मुख्यमंत्री चालणार आहे का अशी खोचक टीका चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंवर करण्यात आली.

चंद्रकांत पाटलांनी यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईकडे लक्ष वेधले. राज्यात अवेळी पावसाने 94 लाख हेक्टरचे नुकसान झाले, शेतकऱ्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई दिली असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला. पाटील म्हणाले की, बांध काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. एकर, हेक्टर हे कळत नाही, हेक्टर म्हणजे काय हे आधी सांगा. एका हेक्टरमध्ये किती एकर, एका एकरात किती गुंठे आणि एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा येते हे सांगा. एमएसपी, एफआरपी म्हणजे का य हे कळत नसून यांना कशाचीही उत्तरे माहित नाहीत अशी खोचक टीका पाटील यांना मुख्यमंत्र्यांवर केली.

पाटलांनी यावेळी सल्ला देताना म्हणाले की दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही पद घेतले नाही. त्यांनी ठरवलं असतं तर ते राष्ट्रपती झाले असते मात्र त्यात शान होती. पहिल्यांदाच आमदार झालेल्याना थोडे प्रशिक्षण घेऊ द्या असे म्हणत त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या आदित्य ठाकरेंवर टीका केली.

पाटील म्हणाले की सत्ता वाटपात 16 मंत्रिपद राष्ट्रवादीला तर 15 मंत्रिपद शिवसेनेला मिळाली. त्यामधून 3 मंत्रिपद घटक पक्षांना दिली. उरलेली 12 मंत्रिपद दोन मंत्रिपदे स्वत:कडे ठेवून घेतली. त्यामुळे राहिलेल्या 10 मंत्रिपदांमध्ये अनेक जण बसत नाहीत म्हणून बऱ्याच जणांना घरचा रस्ता दाखविला. रामदास कदम, दिवाकर रावते यांच्यासारख्या अनेक नेत्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/