Pune News : ‘मी पुण्यात राहणार नाही, देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार’; कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटलांनी भर कार्यक्रमात सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरवरून येऊन पुण्यात कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. यावरून त्यांच्यावर अनेकदा विरोधक टीका करताना दिसतात. यासाठी त्यांना खूपदा ट्रोलही केलं जातं. परंतु आता खु्द्द चंद्रकांत पाटील यांनीच मी कोल्हापूरला परत जाणार असं एका जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केलं.

संस्कृती प्रतिष्ठान आयोजित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते अटल संस्कृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, खासदार गिरीश बापट, वैशाली माशेलकर, महापौर मुरलीधर मोहोळ, पद्मजा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले, दादा जगात काही झाले तरी त्याचा संबंध पुणेकर स्वत:शी जोडतात. देवेंद्र फडणवीस यांचे काका पुण्यात असल्यानं त्यांचाही संबंध जोडतात. तसेच डॉ. माशेलकर हे गोवा, मुंबई इथे राहिले असले तरी ते आता पुणेकरच झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. हाच धागा पकडून चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येकाला पुण्यात सेटल व्हावं असंच वाटतं. मी पुण्यात राहणार नाही. देवेंद्रजी मी परत कोल्हापूरला जाणार आहे. माझ्या विरोधकांना सांगून टाका असं त्यांनी सांगितलं.