भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशांची मागणी, डॉक्टरलाच दिली धमकी

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पैशांची मागणी करत डॉक्टरलाच धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, फोन करणार्‍या व्यक्तीने आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असे नाव सांगितले आहे. त्यामुळे आता फोन कोणी केला आहे ? याचा शोध पोलीस घेत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, कोरोनाबाधित रुग्णांना मदत करण्यासाठी 25 लाख रुपये द्या, पैसे न दिल्यास बघून घेऊ, अशा धमकीचा फोन पिंपरी-चिंचवड शहरातील एका नामांकित रुग्णालयात आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे, फोन करणार्‍या व्यक्तीने आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत आहे, असे सांगितले आहे. शिवाय, पैसे घेण्यासाठी पर्वतीमधील एका कार्यकर्त्यास पाठवत आहे, असेही फोनवरील व्यक्तीने म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फोन करणार्‍या भामट्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मात्र, रुग्णालयातील डॉक्टर भाजप नेत्यांच्या उत्तम प्रकारे संपर्कात असल्याने त्यांनी याबाबतची माहिती थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना संपर्क साधून दिली. तेव्हा आपण किंवा आपल्या कार्यालयातून अशा प्रकारचे फोन कोणालाच केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर फोन करणार्‍या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. त्यानंतर याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सध्या राज्यात करोना विषाणूचा फैलाव अधिक होत आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष आपआपल्या परीने गोरगरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच फायदा घेऊन काही भामटे राजकीय पक्षाच्या नावाने फसवत असल्याचा हा प्रकार करत आहेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.याबाबत पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर म्हणाले, या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. फोन करणार्‍या व्यक्तीला आम्ही लवकरच शोधून काढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. भाजप हा राज्यातील नव्हे तर केंद्रातील चांगला पक्ष आहे. या पक्ष आणि पदाच्या नावाने कोणी फोन करून पैसे मागत असेल तर याची खबरदारी पक्षानेदेखील घ्यायला हवी. अशाप्रकारचे फोन कोणास न गेल्यास पक्षाची देखील प्रतिमा आणखी उत्तम राहण्यास मदत होणार आहे.

राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा निधी वापरतात का ?
कोरोनाबाधितांना मदत करताना राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा निधी वापरतात का ? असा प्रश्न आता या प्रकारामुळे अनेकांना पडत आहे. जर राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा निधी वापरून गोरगरीब लोकांना तसेच कोरोनाबाधित रुग्णांना मदत करत असेल तर, ही बाब खूप कौतुकास्पद म्हणावी लागेल. मात्र, जर राजकीय पक्ष आपल्याकडील पक्ष निधी न वापरता तो कोठून पैसा गोळा करून मदत कार्यासाठी वापरत आहेत ? असा प्रश्न पडल्याशिवाय देखील राहणार नाही. मग, राजकीय पक्ष लोकांना मदत करण्यासाठी कोणाकडून पैसे घेतात किंवा कसे पैसे गोळा करतात ? याचाही शोध घेऊन याची माहिती जनतेसमोर आल्यास उत्तम होईल. जनतेलाही कळेल की राजकीय पक्ष कोणाकडून किंवा कशा प्रकारे पैसे गोळा करून किंवा जमवून किंवा आपला पक्ष निधी वापरून गोरगरीब लोकांची, कोरोनाबाधित रुग्णांची मदत करत असतील, तर याची जाणीव ते मदत स्वीकाणारे आणि इतरही ठेवतील, असे समजते.