महिलेला अश्लिल क्लीप पाठवणाऱ्या भोर-वेल्हा तालुका अध्यक्षाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- संपूर्ण देशात #Metoo च्या माध्यमातून अनेक महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यातच पिंपरी चिंचवड मधील एका भाजप पदाधिकाऱ्याचा पक्षाच्या एका तालुका अध्यक्षाने विनयभंग केल्याची घटना समोर आली. तालुका अध्यक्ष असणाऱ्या या भाजपच्या नेत्याने पिंपरीमधील एका पदाधीकाऱ्याला अश्लिल व्हिडीओ पाठवून त्यांचा विनयभंग केला. पीडित महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या नेत्याला बेड्या ठोकल्या असून शिवसेनेने नेत्यावर कडक कारवाई करण्यासाठी आज (मंगळवार) निदर्शने केली.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादेनुसार, आनंद देशमाने हे वेल्हा तालुक्याचे भाजपचे तालुका अध्यक्ष असून पीडित महिलेची ओळख तीन वर्षांपूर्वी एका सामाजीक कार्यक्रमामध्ये झाली होती. त्यावेळी देशमाने याने पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. दोन आठवड्यापासून आनंद देशमाने हा महिलेच्या व्हॉटस्अॅपवर मेसेज पाठवत आहे. त्यावेळी त्याला मेसेज पाठवण्यास मनाई केली होती. तरी देखील तो मेसेज पाठवत होता.

आनंद देशमाने याने रविवारी (दि.२८) रात्री दहाच्या सुमरास मेसेज करुन व्हिडीओ आवडला अशी विचारणा करुन पती घरी आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी पीडित महिलेने पती घरी नसल्याचे सांगितले. त्यानंतर आनंद देशमाने याने महिलेला अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. महिलेने फिर्याद दिल्यानंतर देशमाने याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले.

दरम्यान, आज शिवसेनेच्या वतीने भाजपच्या नेत्यावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे याच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आले. यावेळी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले. यावळी वेदश्री काळे, शशिकला उभे, स्मिता जगदाळे, आशा भालेकर, रुपाली आल्हाट, विजया जाधव, नंदा दातकर, जनाबाई गोरे, दमयंती गायकडा, श्रीदेवी लामजने, कोमल साळुंखे, अक्षदा शेळके आदी उपस्थित होते. यावेळी सामाजीक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत अशा प्रकारची घटना घडणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांना कडक शासन झाले पाहिजे. अशी मागणी यावेळी करण्यात आली.