राहुल गांधी सर्वात ‘खोटारडे’, भाजपाचा NRC वरून ‘हल्लाबोल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) दोन्ही सभागृहांत मान्य करून घेतला. मात्र या कायद्यावरून देशातील काही ठिकाणी विरोध दर्शविला जात असताना दुसरीकडे देशातील राजकीय वातावरणही तापले आहे. विरोधी पक्षांकडून सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे भाजपाकडून या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.

हा सगळा गोंधळ सुरु असताना आता केंद्र सरकारने देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधीच आक्रमक झालेले विरोधक आणखीनच संतापले आहेत. त्यामुळे या मुद्द्यांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भाजपावर सतत टीकास्त्र सोडत आहेत.

मात्र राहुल गांधी यांच्या या टीकांना भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ‘राहुल गांधी 2019 मधील सर्वांत जास्त खोटारडे आहेत. तसेच भ्रष्टाचार हीच काँग्रेसची संस्कृती आहे. काँग्रेसमध्ये 2जी टॅक्स, जयंती टॅक्स आणि कोळसा टॅक्स होता. एनपीआरला गरिबांवरील टॅक्स म्हणणे हास्यास्पद आहे. एनपीआरच्या माध्यमातून गरिबांना मदत केली जाईल.”

याचबरोबर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. ‘सीएएमुळे अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाईल, अशी अफवा काँग्रेस आणि कंपनी पसरवत आहे. मात्र राहुल यांना मी आव्हान देतो की, या कायद्यात कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्याचे सिद्ध करून दाखवा. सोबतच ”मी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, सीएए समजून घ्या आणि नंतर इतरांनाही समजावून सांगा. नाहीतर खोटे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे राजकीय पक्ष आपल्या व्होट बँकेसाठी आपल्याला एकमेकांविरोधात असेच लढवत राहतील.”

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/