‘सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपाकडून वापर’

चंदीगड : पोलीसनामा ऑनलाइन –  “सत्तेच्या भुकेपायी भाजपा राज्यपाल पदाची प्रतिष्ठा कमी करत आहे,” असा शब्दांत हल्ला करत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार अस्थिर करण्याचा खालच्या दर्जाचा प्रयत्न भाजपा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पंजाब भाजपाकडून करण्यात आलेल्या ट्विटला प्रत्युत्तर देताना अमरिंदर सिंग म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने राज्यात कायदे-व्यवस्था राखण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे भाजपा नेत्यांना माहिती नाही का? केंद्रात सत्तेत असण्याबरोबर लोकशाही संस्थानचे संरक्षक असणाऱ्या पक्षासाठी ही कार्यप्रणाली योग्य नाही.”

“सत्तेची भूक भागवण्यासाठी राज्यपाल कार्यालयाचा भाजपाकडून आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. हे बंगालमध्ये सुरु आहे, महाराष्ट्रात सुरु आहे तसेच पंजाबमध्येही त्यांचा प्रयत्न सुरु असल्याचा,” आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच पंजाब दुसरा पश्चिम बंगाल बनतोय असेही अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.