Maratha Reservation : भाजपची मोठी घोषणा ! कार्यकर्ते पक्षाचा झेंडा किंवा बॅनर न वापरता मोर्चात सहभागी होतील (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालायने राज्याचा मराठा आरक्षण कायदा रद्द केला. यानंतर संयमाची भूमिका घेणारे नेते आता आक्रमक होत आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेणारे खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्याचा दौरा सुरु केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपने मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा, बॅनर न घेता मराठा आरक्षणासाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होती. अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मांडली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

म्हणून पक्षाचा झेंडा वापरणार नाही

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, भाजपने तसं पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. कोणाताही नेता किंवा संघटना मराठा समाजाच्या हितासाठी आंदोलन करणार असेल तर भाजप त्यात पक्षाचा बॅनर, झेंडा, बिल्ला न वापरता सहभागी होतील. तसेच पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे देखील त्यामध्ये सहभागी होती. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राजकीय स्वरुप येऊ नये यासाठी भाजप पक्षाचा झेंडा वापरणार नाही. सर्व सकारात्मक आणि अहिंसात्मक आंदोलनात भाजप सहभागी होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आघाडी सरकारने सारथी संस्थेची वाट लावली

मराठा समाज मागास आहे आणि 50 टक्क्यांच्या वर जाऊन या समाजाला आरक्षण देण्यासारखी अपवादात्मक स्थिती आहे. हे सिद्ध करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागत असताना देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी अनेक उपाय केले. यामध्ये सारथी ही संस्था हा महत्त्वाचा उपाय होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारने सारथी संस्थेची वाट लावली. सध्या संस्थेचे काम चालू आहे की नाही हे देखील समजत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर केली.

आरक्षणासाठी प्रदीर्घ प्रक्रिया करावी लागेल

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत प्रदीर्घ प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या प्रमाणे सवलती दिल्या, तशा सवलती आघाडी सरकारने मराठा समाजाला द्याव्यात, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.