जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या हिंदू मुख्यमंत्र्यांसाठी भाजप प्रयत्नशील, राजकीय हालचालींना वेग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बसवण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. देशाचे नवे गृहमंत्री अमित शाह यांनी काल दिल्लीत बैठक घेतली. त्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे जम्मू-काश्मीर मधील राजकीय वातावरण देखील तापले आहे. जम्मू-काश्मीर मधील सुरक्षा वाढवण्याच्या मुद्यावर बैठक घेण्यात आली होती. मात्र याच बैठकीत जम्मू- काश्मीरच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर देखील चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जम्मू-काश्मीरच्या राजकारणात वादंग उठला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जम्मू- काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बसवण्यासाठी भाजपच्या हालचाली चालू असल्याच्या चर्चाने वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद कश्मीर खोऱ्यात उठले आहेत. काश्मीर खोऱ्यांतील नेत्यांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये काश्मीर संबंधित प्रश्नांवर चर्चेसाठी बैठक बोलावली होती. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत मुद्दा देखील या बैठकीत चर्चीला गेला. परंतू मतदारसंघाच्या पुनर्रचनेवर चर्चा झाल्याच्या चर्चेला उधाण आले आणि काश्मीर खोऱ्यातील नेत्यांमधून संतापजनक प्रतिक्रिया आल्या.

भाजप-पीडीपी यांचे सरकार सत्तेतून खाली आल्यानंतर 2018 पासूनच जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. परंतू या वर्षाच्या अखेरीस जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूका पार पडतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळे भाजप तयारीला लागल्याची चर्चा आहे. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जम्मू काश्मीरमधील निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारानंतर सरकारने मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कायदेशीर स्थितीनुसार जम्मू काश्मीरसह संपुर्ण देशात मतदारसंघ पुनर्रचना 2026 पर्यंत करण्यात येणार नाही. कारण नवीन जनगणना झाल्यानंतरच या संदर्भातील प्रक्रिया पुर्ण होऊ शकते. तसेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी काही काळाचा अवधी लागतो. परंतू आता भाजप जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बसवणार का यावरुन चर्चा रंगली आहे तर काश्मीर खोऱ्यातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे.