कर्नाटकातील सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून ‘ड्रग्स’ आणि ‘बेटींग’च्या पैश्याचा वापर झाल्याचा आरोप

बंगळुरू : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेस युतीचे सरकार गतवर्षी अल्पमतात आल्याने पडले होते. त्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात घोडे बाजार केला होता. दरम्यान, आता जेडीस आणि काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यासाठी भाजपकडून अंमली पदार्थ, सट्टेबाजी आणि अवैध मार्गाने आलेल्या पैशाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोपी माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे.

सोमवारी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांना कन्नड चित्रपट क्षेत्र आणि ड्रग्ज माफियांच्या संबंधात प्रश्न विचारला असता कुमारस्वामी म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री असताना अनेक ड्रग्ज माफिया कारवाईच्या भीतीने श्रीलंकेत पळून गेलेले. कर्नाटकातील आमचे सरकार अस्थिर करण्याच्या पाठीमागे याच ड्रग्ज माफियांचा हात होता. ड्रग्ज माफिया आणि क्रिकेट सट्टेबाजीतून आलेल्या पैशाच्या जोरावरती भाजपने कर्नाटकातील जनता दलाचे (सेक्युलर) सरकार पाडले,’ असा आरोप कुमारस्वामी यांनी केला

तथापि, मागील काही दिवसांपासून चित्रपट दिग्दर्शक इंद्रजित लंकेश यांच्या एका वक्तव्यामुळे कन्नड चित्रपटसृष्टी आणि ड्रग्ज माफियांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता. त्याच अनुषंगाने सोमवारी कर्नाटकातील केंद्रीय गुन्हे शाखेकडून इंद्रजित लंकेश यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना चित्रपटसृष्टी आणि ड्रग्ज माफियांच्यात असलेल्या संबंधाविषयी महत्वपूर्ण माहिती दिल्याचं समजत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील राजकारण आता चांगले तापू लागले आहे.