३७० कलम रद्द आणि राम जन्मभूमी मुक्त करण्यासाठी भाजपचे ४०० खासदार निवडून आणण्याची गरज

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौंड येथील सभेत व्यक्त केले मत

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – काश्मीर मधील ३७० कलम रद्द करायचे असेल आणि राम जन्मभूमी मुक्त करायची असेल तर भाजपचे किमान चारशे खासदार निवडून आणावे लागतील. तसेच ३७० कलम रद्द झाल्यास तेथे एक लाख निवृत्त सैनिकांना घरे आणि जमीन दिली जाईल असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दौंड तालुक्यातील चौफुला येथे केले. ते बारामती लोकसभा मतदार संघातील युतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात बोलत होते.

पुढे बोलताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण हे खऱ्या अर्थाने आम्ही दिले असून १९६८ पासून मराठा आरक्षणाची मागणी होती पण पवारांनी ते होऊ दिले नाही असा आरोप केला.

यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, भाजप जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल, युतीच्या बारामती लोकसभा उमेदवार कांचन कुल यांची भाषणे झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळेंवर यावेळी निशाणा साधला. अजित पवारांच्या तुम्हाला मंदिरातील घंटा तरी वाजवता येते का या विधानावरून त्यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली.

आमदार राहुल कुल यांनी सुप्रिया सुळेंच्या सेल्फी फॅक्टरला सेल्फी विथ वर्क फॅक्टरने उत्तर देत असल्याचे सांगितले. तर बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांनी गेली दहा वर्षे ज्यांच्याकडे खासदारकी आहे त्यांनी नेमके कोणते भरीव काम केले ते दाखवून द्यावे असे म्हणत, या तालुक्यामध्ये आमदार राहुल कुल यांनी मोठा निधी आणून भरीव कामे केल्याचे सांगितले.

दौंड तालुक्यातील चौफुला येथे बारामती लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ हा मेळावा घेण्यात आला होता.
या मेळाव्याला राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, दौंडचे आमदार राहुल कुल, लोकसभेच्या उमेदवार कांचन कुल, भाजप पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, वासुदेव काळे, नामदेव ताकवणे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

You might also like