Aurangabad News : महापालिका निवडणूक BJP स्वबळावर लढणार, नागरी विकास आघाडीचा प्रश्नच नाही

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   औरंगाबाद महापालिकेची आगामी निवडणूकीत भाजपा स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे वेगळी नागरी विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा भाजपच्या वरीष्ठ स्तरावरून केला आहे. या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांना विचारले असता ते म्हणाले की, पालिका निवडणुकीच्या राजकारणात माझे पूर्ण लक्ष आहे. भाजप स्वबळावर सर्वच्या सर्व जागा लढविणार आहे.

नागरी विकास आघाडी स्थापन करून मानसिंग पवार यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, असे काही घडणार नाही. माझा भाजपशी किंबहुना राजकारणाशी काही संबंध नाही, असे स्वतः मानसिंग पवार यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पवार यांनी सतीश चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांची बाजू घेतली होती. भाजप म्हणून आम्ही जागा लढवू. तूर्त तरी रिपाइं (ए) सोडता आम्हाला कुणी मित्रपक्ष नाही. आम्ही भाजप म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे बागडे म्हणाले.

भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यासंदर्भात म्हणाले, नागरी विकास आघाडीचा प्रश्नच नाही. भाजप म्हणून आम्ही स्वबळावर सर्व जागा लढविणार असल्याचे सांगितले. दरम्यान मानसिंग पवार म्हणाले, मी नेहमीच राजकारणापासून दूर राहात आलो. आताही मी दूरच आहे.