बिहारच्या निकालानंतर भाजपाचं ‘मिशन मुंबई महापालिका’ !

 मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन –बिहार विधानसभा निवडणुकीत २० वर्षांत पहिल्यांदाच भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तो मोठा पक्ष ठरला आहे. या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या निकालावरूनच पुन्हा एकदा राज्यात भाजप-शिवसेनेचे कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. बिहारमधील यशाचा पॅटर्न आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत वापरण्याची तयारी भाजपने केली आहे. तसे संकेतही भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी दिले आहेत.

आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत बिहार निवडणुकीसारखे परिणाम पाहायला मिळतील. शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी करत महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली ते जनतेला आवडलं नाही. त्यामुळेच काँग्रेसला बिहारमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं.

त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतही जनता शिवसेनेची साथ सोडेल असा दावा त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. फडणवीस सरकारने जी कामं केली, त्याच्या आधारे आम्ही जनतेला मतदान मागणार आहोत. महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, या निवडणुकीवर देवेंद्र फडणवीसांनी लक्ष केंद्रित केले आहे असून, मुंबई महापालिकेत यंदा परिवर्तन नक्कीच दिसणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काय आहे बिहार पॅटर्न?
बिहार निवडणुकीची धुरा देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली होती. प्रचारात त्यांनी सरकारने केलेली कामे, विकासाचे मुद्दे, त्याचबरोबर विरोधकांनी मांडलेले मुद्दे कसे चुकीचे आहेत यावर स्पष्टीकरण, आगामी काळात काय करणार आहोत, याची कल्पना आदी मुद्दे मांडून लोकांचा विश्वास संपादन केला. त्याचे फलित म्हणजे भाजपचा विजय. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बिहार पॅटर्न अमलात आणण्यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस रणनीती आखत आहेत. या निवडणुकीत अशी रणनीती बनवणार असून, त्यात बूथस्तरावरील भाजप कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. विकासाचे मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश यावर जनतेकडे मतदान मागितलं जाणार आहे. शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता अन्य कोणत्याही नेत्याचा थेट मतदारांशी संपर्क नाही. भाजपचे असे बरेच नेते आहेत, ज्यांचा मतदारांशी संपर्क आहे, असंही भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.