अस्लम शेख यांच्या ‘त्या’ मागणीवरून भडकले भातखळकर, म्हणाले – ‘मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजपा कदापि यशस्वी होऊ देणार नाही’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुंबईसह (Mumbai) संयुक्त महाराष्ट्राच्या नावाने कायमच राजकारण करणाऱ्या शिवसेनेची (Shivsena) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्लम शेख यांच्या या वक्तव्याविषयीची भूमिका काय आहे? असा प्रश्न सुद्धा भातखळकर यांनी विचारला आहे. याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त देण्याची मागणी करणे, अत्यंत निंदनीय आहे. या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षड्यंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे, असे सांगत भाजपा मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी अस्लम शेख यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई शहर व उपगरासाठी दोन आयुक्त नेमावे अशी मागणी अस्लम शेख यांनी काल केली होती. या मागणीवरून अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल चढवला. अस्लम शेख यांना मागील ११ वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत असलेल्या मालाडमधील नागरिकांना महानगरपालिकेच्या संदर्भातील कामे करण्यासाठी होत असलेली अडचण दूर व्हावी, या करिता कधीही प्रयत्न करावेसे वाटले नाहीत.

मात्र, मी आमदार झाल्यापासून मालाड पूर्व, कुरार गाव, दिंडोशी येथील नागरिकांचे हेलपाटे थांबावे याकरिता वेगळा प्रशासकीय प्रभाग व्हावा, यासाठी सतत पाठपुरावा करत होतो. माझ्या मागणीवरून मुंबई मनपाच्या पी/उत्तर वार्डचे विभाजन करून पी/पूर्व व पी/पश्चिम असे दोन प्रशासकीय प्रभाग करण्याचा निर्णय मुंबई मनपाने घेतला आहे. या वाईट भावनेतून अस्लम शेख यांनी आता मुंबईसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केली आहे. याआडून मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा जो डाव आहे, तो भाजपा कदापि यशस्वी होऊ देणार नाही आणि असे करण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.