‘भाजपला आता कधीच अच्छे दिन येणार नाहीत’, राष्ट्रवादीचा विश्वास वाढला

मुंबई  :  पोलीसनामा ऑनलाईन –   सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपकडून सत्ता खेचून आणली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पूणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार हे संकेत मिळाले होते. त्याच्यावर सांगली महापौर विजयाने शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच, यापुढे भाजपाला राज्यात कुठेच अच्छे दिन येणार नसल्याचे भाकितही त्यांनी केले आहे.

सांगली महापौर – उपमहापौर पदाची मंगळवारी (दि. 23) निवडणूक झाली असून भाजपचा पराभव करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी विजयी, तर उपमहापौरपदी कॉंग्रसेचे उमेश पाटील निवडून आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगली पालकमंत्री जयंत पाटील यांचे हे काम नक्कीच उल्लेखनीय आहे असेही तपासे यांनी म्हटले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्य करत होते. परंतू पुणे पदवीधरची निवडणूक झाली आणि आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याची जोरदार टीका तपासे यांनी केली आहे. भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी स्वीकारून दाखवून दिल्याचे तपासे यांनी म्हटले आहे.