अखेर ठरलं ! भाजप सरकार स्थापन करणार नाही, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप सरकार स्थापन करू शकत नाही असं भाजपानं राज्यपालांना सांगितलं असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. राज्यपालांची भेट झाल्यानंतर पत्रकार परिषदेत याबाबत चंद्रकांत पाटलांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कोण सरकार स्थापन करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यपालांकडून आता कोणाला आमंत्रण दिलं जातं की आणखी काय निर्णय राज्यपाल घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता करायची असेल तर आमच्या शुभेच्छा असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे हे उपस्थित होते. भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव हे आजच दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेवुन ते कोअर कमिटीच्या बैठकीत पोहचले होते. कोअर कमिटीच्या सदस्यांशी त्यांची चर्चा देखील झाली.

बैठकीदरम्यान भाजपाचे अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सत्तास्थापनेबाबत राज्यातील भाजपाच्या नेत्यांना मार्गदर्शन केले. सर्वात मोठा पक्ष असल्यानं राज्यपालांनी काल (शनिवारी) भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. 11 नोव्हेंबरला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर सत्ता स्थापन करायची का नाही यावर भाजपमध्ये मोठी चर्चा झाली आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निकाल लागल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासुनच शिवसेनेची भाषा बदलली असल्याचा आरोप भाजपनं शिवसेनेवर केला. मुख्यमंत्री पदावर अडलेल्या शिवसेनेनं विधानसभेसंदर्भात लोकसभा निवडणुकीपुर्वीच सर्वकाही ठरलं होतं असं सांगितलं. 50 -50 ठरलेलं भाजप मान्य करत नाही असं देखील शिवसेनेकडून सांगण्यात आलं. तर 50 – 50 बाबत कधीच निर्णय झाला नव्हता असं भाजपाकडून वेळावेळी सांगण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर राजकीच हालचालींना प्रचंड वेग आला.

राज्यात फोडाफोडीचं राजकारण होणार हे जवळपास स्पष्ट झालं. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले. दरम्यान, भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व आरोप फेटाळले. शिवसेनेनं त्यांच्या सर्व आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्व आमदार जयपुर येथे बैठकीसाठी दाखल झालं. तेथे झालेल्या बैठकीत जवळपास सर्वच आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र, त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांच्या मागण्या या वेगवेगळया असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी करणार असल्याचं प्रसार माध्यमांना सांगितलं. आम्हाला म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनं विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्ही विरोधी पक्षात बसणार असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी पहिल्या दिवसापासुनच आपण विरोधी पक्षात बसणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांच्याशी दररोज शिवसेनेचे नेते संजय राऊत भेटत होते. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येवुन सरकार स्थापन करणार आणि काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देणार काय अशी चर्चा चालु झाली.

आज (रविवार) शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. बैठकीदरम्यान ठाकरे यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, आपल सरकार महाराष्ट्रात येईल असं सांगितलं. दरम्यान, त्यांनी भाजपसोबत असलेली युती अद्यापही आपण तोडलेली नाही असं देखील सांगितलं. दि. 24 ऑक्टोबर पासुन चालु असलेल्या सत्ता बाजारात अखेर भाजपानं हा मोठा निर्णय घेतला आहे.

Visit : Policenama.com