शरद पवारांनी तेढ निर्माण करु नये, ‘सिल्व्हर ओक’वर 50 हजार पोस्टकार्ड पाठवणार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन –   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनावरून केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथेही आंदोलन सुरु करण्यात आले आहे. जय श्री राम असं लिहिलेली सुमारे 50000 हजार पोस्टकार्ड शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवण्यात येणार आहे.
परळी येथे बुधवारी शरद पवार यांच्याविरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी शरद पवार याच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी परळीत पोस्ट ऑफिससमोर निदर्शने करत जय श्री राम नावाचे 5 हजार पोस्ट कार्ड पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पाठवण्यात आली.

तसेच बीड जिल्ह्यासह संबंध भारतातून शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर 50 हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजप युवक जिल्हा अध्यक्ष अरुण पाठक, शाम गित्ते यांनी सांगितले आहे. प्रभू श्रीराम यांच्याबाबत बोलून शरद पवार यांनी समाजात तेढ निर्माण करु नये, असंही अरुण पाठक यांनी यावेळी म्हटले. दरम्यान नाशिकमध्ये शरद पवार खासदारकीची शपथ घेत असताना त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

काय म्हणाले होते शरद पवार ?

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधानांनी राम मंदिर ट्रस्टचं निमंत्रण स्विकारलं आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनावरून मोदी सरकारवर खोचक टीका केली होती.

कोरोनामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे. मात्र, काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आम्हालाही वाटतं की कोरोना संपवला पाहिजे. पण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आमचे सहकारी खासदार आहेत, ते दिल्लीत जाऊन या मुद्यावर प्रश्न मांडतील, असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं होतं.