सावरकरांच्या मुद्यावर भाजप ‘आक्रमक’, शिवसेनेला कोंडीत पकडणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवास आहे आणि हा दिवस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून चांगलाच गाजणार आहे. कारण या मुद्दयांवर भाजप आक्रमक झाली आहे आणि या मुद्द्यावरून सेनेला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. आज सावरकर यांची पुण्यतिथी आहे. सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधिमंडळात आणण्याचा आग्रह भाजपनं केला होता. मात्र सत्ताधारी पक्षाने त्याला नकार दिल्याने भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. सत्तेच्या लोभापायी शिवसेना सावरकरांचा अपमान सहन करतेय असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

या आरोपाला शिवसेना कसे उत्तर देणार हे आता सभागृहातच कळणार असून,सावरकरांच्या गौरवाच्या मुद्यावर प्रस्ताव आणण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध आहे. या विषयावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. सावरकर हा शिवसेनेच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. खासदार संजय राऊत यांनी यावरून राहुल गांधी यांच्यावर टीकाही केली होती. सेनेने आतापर्यंत ह्या बाबतीत भाजपाला फारसे महत्व दिलेले नाही आहे.

Advt.

सावरकरांबद्दल वाईट बोलणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे अशी टीका संजय राऊतांनी केली होती, यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत आरोप -प्रत्यारोप देखील झाले होते. सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती. ते माफीवीर आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘शिदोरी’ या मासिकात सावरकरांवर एक आक्षेपार्ह लेख प्रसिद्ध झाला होता, त्या वरूनही वातावरण तापले होते. हा लेखामुळे सावरकरांचा अपमान झाला असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या मुद्यवर सेना भाजपाला काय उत्तर देते , त्यावर महाविकास आघाडीतील चित्रे स्पष्ट होणार आहेत.