मुंबई मनपामध्ये शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजप ‘रेडी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेचे स्वप्न भंग करत शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला. त्याचा वचपा काढण्यासाठी भाजप तयारीला लागला आहे. शिवसेनेचा गड असलेल्या आणि मागील तीन दशकांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेत सत्ता आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. प्रचंड मोठे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेत एक हाती सत्ता कायम राहावी यासाठी शिवसेना आपली संपूर्ण ताकद पणाला लावते. याच महापालिकेत शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपच्या आज झालेल्या बैठकीमध्ये मेगा प्लॅन तयार केल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

भाजपने शिवसेनेला धक्का देण्यासाठी तयार केलेल्या प्लॅनमुळे आगामी काळात मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढाई होणार आहे. आज झालेल्या बैठकिनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, 2022 मध्ये महानगरपालिकेची सत्ता भाजप एकहाती जिंकेल. त्यासाठी जास्त काम येथे करू. मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर होईल हे आमचं टार्गेट आहे. त्यासाठी आम्ही आत्तापासूनच कामाला लागणार आहोत. या बैठकीत आम्ही मुंबईवरच चर्चा केली. तसेच 30 तारखेपर्यंत मुंबई भाजपचा नवीन अध्यक्ष घोषीत होईल असंही ते म्हणाले.

अजित पवारांना ‘क्लिन चिट’ नाही
सरकारच्या खातेवाटप लांबल्याच्या घटनेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्या बापाने आपला संसार नीट करावा हे सांगितलं. विनाकारण दुसऱ्याच्या संसारात लक्ष नको यावर आता बोलायचे नाही. भाजपने अजित पवार यांना क्लिन चिट दिली नाही. आताच्या सरकारच्या काळात अजित पवार यांच्याबाबत प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

खडसे वेगळा विचार करणार नाहीत
एकनाथ खडसे यांनी वेगळा विचार करण्याचे वक्तव्य केले होते. यावर बोलताना पाटील म्हणाले, खडसे हे 1978 पासून भाजपसाठी काम करत मोठे झाले. भाजप संघटनेत खडसे यांचा मोठा वाटा आहे. ते वेगळा विचार करणार नाहीत. त्यांच्याशी दीर्घ चर्चा झाली. जे चुकीचे झाले त्यावर कारवाई करु असे आश्वासन त्यांना दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like