युती झाली नाही तर शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकू : दानवे

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाजप सेनेच्या युतीच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. असे असताना राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र युती झाली नाही तर आता लोकसभेत भाजपकडे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा एक जागा भाजप जास्त जिंकेल असा दावा दानवेंनी केलाय. दानवेंचा हा दावा म्हणजे शिवसेनेला टोला समजला जातोय.

येत्या २८ तारखेला जालन्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, “भाजपने २०१४ मध्ये जिंकलेल्या जागांपेक्षा एक जागा जास्तच जिंकू पण कमी नाही, राज्यात समविचारी पक्षांची युती झाली पाहिजे. मतविभाजन होऊन त्याचा फायदा कांग्रेस राष्ट्रवादीला होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.”

दरम्यान, याचवेळी सेनेकडून अर्ध्या जागा मागण्यात आल्याच्या प्रश्नावर, तसा कुठलाच प्रस्ताव सेनेकडून आला नाही आणि त्यासंदर्भात एकही बैठक झाली नसल्याचा दावा ही दानवे यांनी यावेळी बोलताना केला.