कलम 370 हटवल्यानंतर लडाखमध्ये झालेल्या निवडणुकीत BJP चा विजय, LAHDC च्या 26 पैकी 15 जागा जिंकल्या

लेह : वृत्तसंस्था –   लडाखच्या स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेच्या (Ladakh Autonomous Hill Development Council election) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने 15 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेसच्या खात्यात 9 जागा आल्या आहेत. याशिवाय दोन अपक्ष उमेदवारांनी सुद्धा विजय मिळवला आहे. एलएएचडीसीच्या 26 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. मागच्या वर्षी या क्षेत्राला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर ही पहिली लोकाशाही प्रक्रिया होती. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) सह काही प्रादेशिक पक्षांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.

भाजपाच्या विजयावर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी अभिनंदन केले आहे. नड्डा यांनी ट्विट केले की, लेह स्वायत्त पर्वतीय विकास परिषदेत भाजपाचा विजय. लेह निवडणूक ऐतिहासिक आहे; 26 पैकी 15 जागांवर भाजपाने विजय नोंदवला आहे. मी जाम्यांग शेरिंग नामग्याल आणि भाजपाच्या लडाख युनिटच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. भाजपावर विश्वास दाखवल्याबद्दल लडाखच्या लोकांचे आभार.

लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद निवडणुकीत गुरुवारी लेहमध्ये 65.07 टक्के मतदान झाले होते. एका अधिकार्‍याने सांगितले की, सहावी लडाख स्वायत्त पर्वतीय विकास परिषद-लेह निवडणूक संपूर्ण जिल्ह्यात झाली. माहितीनुसार, एकुण 65.07 टक्के मतदारांनी निवडणुकीत उरलेल्या 94 उमेदवारांच्या निवडीसाठी मतदानाचा हक्क बजावला होता.

येथे 26 जागांसाठी भाजपा, काँग्रेस, आपसह 23 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर आम आदमी पक्षाचे 19 उमेदवार होते. 45,025 महिलांसह 89,776 मतदार 26 जागांसाठी क्षेत्रांमध्ये पसरलेल्या 294 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार होते. 94 उमेदवारांमध्ये भाजपा आणि काँग्रेसचे 26-26 उमेदवार सहभागी होते. निवडणूक प्रक्रिया 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एलएएचडीसी – लेहमध्ये एकुण 30 जागा आहे आणि चार सदस्य सरकारद्वारे निवडले जातील.

You might also like