‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात भाजपची ठाकरे सरकारला साथ, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्यांनी सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. भाजपकडून या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या बुधवारी करण्यात येणारं जेलभरो आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज याबाबत माहिती दिली.

भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, राज्यभरात 500 ठिकाणी भाजपनं जेलभरो आंदोलन करण्याची तयारी केली होती. जवळपास 50 हजार शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जेलमध्ये जाण्याच्या तयारीत होते. परंतु राज्यावरील वाढतं कोरोना संकट पाहता आता हे आंदोलन पुढं ढकलण्यात आलं आहे. या कोरोनाच्या संकटकाळात भाजप सरकारसोबत आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात सरकारला पूर्ण सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बावनकुळे म्हणाले, फेसबुकच्या माध्यमातून संवादासाठी 26 मिनिटे देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ एक मिनिट देऊन मध्यमवर्गीय, आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती द्यावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की, राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट तर नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. विदर्भातील अमरावतीसह काही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुण्यातही दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. जनतेनं कोरोनाचे नियम पाळावेत. पुढील आदेशापर्यंत राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना मनाई करण्यात येत आहे असंही त्यांनी जाहीर केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि 21 फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना रुग्णांवरून चिंता व्यक्त करत लोकांनी नियम पाळले नाहीत, तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल असा इशाराही दिला.