Coronavirus : ‘कोरोना’ला पिटाळून लावण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी नानातर्‍हेने प्रयत्न केले जात आहेत. अशीच एक घटना कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी थेट हवेत गोळीबार केल्याची घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर इथे घडली आहे. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजू तिवारी यांनी कोरोनाला पळवण्याासाठी रिवॉल्वरमधून हवेत गोळीबार केला आहे. त्यांनी हा गोळीबार करण्याचा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला आहे.

कोरोना व्हायरसचे वाढते थैमान सुरू असताना हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर कोरोनाविरोधात लढण्यासाठी रविवारी 9 वाजून 9 मिनिटांला दिवा पेटवून देशातील जनतेने राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. मात्र दुसरीकडे बलरामपूर इथे कोरोनाला पळवून लावण्यासाठी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षांनी थेट हवेत गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंतप्रधान मोदींनी दीप प्रज्वलनाचे आवाहन केले होते.

दिवे लावून झाल्यानंतर मंजू तिवारी यांनी कोरोनाला पऴवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी हातात रिवॉल्वर घेऊन गोळीबार करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांच्या या व्हिडीओला लाईक्स आणि कमेंट्स वाढत चालल्या आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशा पद्धतीने हवेत गोळीबार केल्याप्रकरणी त्यांच्यावर पक्ष आणि पोलीस कारवाई करणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.