पोलिसावर हात उचलणाऱ्या भाजपा कार्य़कर्त्याला कपडे फाटेपर्यंत चोपले

ग्वालियर (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात काँग्रेस आणि भाजपामधील वाद शिगेला पोहचला आहे. लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याआधी वेगवेगळ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची जणू स्पर्धाच या दोन पक्षांमध्ये लागली आहे. ग्वालियरमध्ये काँग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांच्या अशाच एका कार्यक्रमामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता एका कार्यकर्त्याने पोलिसांवरच हात उचचला. या प्रकारानंतर संतापलेल्या पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला कपडे फाटेपर्यंत चोपले.

एका मोठ्या रुग्णालयाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमासाठी ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार होते. ही बातमी समजल्यानंतर स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी भूमिपुजनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आंदोलन सुरु केले. मध्य प्रदेशात भाजपा सत्तेत असताना या रुग्णालयाच्या कामाचे दोनदा भूमिपुजन झाल्याचे भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने पोलिसांवर हात उगारला. या प्रकाराने संतापलेल्या पोलिसांनी ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याचा चांगला समाचार घेतला. या कार्यकर्त्याची पोलिसांनी अगदी कपडे फाटेपर्यंत मारले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

एक हजार बेड्सची क्षमता असणाऱ्या या रुग्णालयाचे काम काही कारणांमुळे थांबवण्यात आले होते. मात्र जानेवारी महिन्यामध्ये राज्यात सत्तापालट झाल्यानंतर काँग्रेस सत्तेत आल्यावर ज्योतिरादित्यांच्या पुढाकाराने ९ हेक्टर जमीन रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आली. ज्योतिरादित्य यांच्या पुढाकाराने जमीन मिळाली असल्याने भूमीपूजनासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते अशी माहिती एका स्थानिक काँग्रेस नेत्याने दिली.