‘या’ कारणामुळे महावितरणच्या अधिकाऱ्याने जमीनीवर नाक घासत मागितली माफी

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने वैभववाडी येथील वीज वितरण कार्यालयातील अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज या वीज वितरण कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातील पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केले. भाजप कार्याकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचून दाखवल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या चुक कबुल केली आहे.

महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांच्या विरोधातील पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले. तसेच या अधिकाऱ्यांनी कनेक्शन देण्याकरीता टाळाटाळ केली व पैशांची मागणीसुद्धा केली असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या आरोपानंतर त्या २ अधिकाऱ्यांनी आपल्यावरील तक्रार मान्य केली व माफीसुद्धा मागितली आहे. वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना मुदत द्या, कोरोना काळातील वाढीव बिले माफ करा, कोरोनामुळे नागरिक त्रस्त असल्याने ग्राहकांना तगादा लावू नका या प्रकारच्या मागण्या भाजपकडून करण्यात आल्या आहेत.

या मागण्या करताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयातील अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलनसुद्धा केले. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना अखेर माघार घ्यावी लागली. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे एका अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी जमिनीवर नाक घासत सगळ्यांची माफी मागितली.