भाजप कार्यकर्त्यांना ‘अतिउत्साह’ नडला, पोलीस ठाण्यात ‘फवारणी’ करणं पडलं ‘महागात’

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे राज्यात हाहाकार उडाला आहे. केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारने नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यांवर अकडलेल्या गरजूंना लोक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. परंतु पनवेलमध्ये अवैधरित्या परिसरात निर्जंतुकीरण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. भाजप कार्यकर्त्यांवर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी अवैधरित्या परिसरात निर्जंतुकीरण केल्याने पनवेल मनपाने हा गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्ता हॅपी सिंग यांच्या सोबत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरजूंना अन्नधान्याची मदत किंवा परिसरात निर्जंतुकीरण फवारणी महापालिकेच्या मार्फत करण्याचे आदेश आहेत. मात्र, असे असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी अतिउत्साहाच्या भरात पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या महाभाग कार्यकर्त्यांनी परिसरासोबतच कामोठे पोलीस ठाण्यात देखील निर्जंतुकीकरणाची फवारणी केली. त्याचबरोबर संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन देखील केले. या कार्यकर्त्यांनी ज्या पोलीस ठाण्यात फवारणी केली होती. त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.