भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये सापडला ड्रग्जचा मोठा साठा, पोलिसांनी केली अटक

कोलकाता : वृत्तससंस्था – कोलकाता येथे भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांना सापडला असून याप्रकरणी पोलिसांनी महिला नेत्याला अटक केली आहे. पामेला गोस्वामी असे या महिला नेत्याचे नाव आहे. तसेच त्यांचा मित्र प्रोबिर कुमार डे याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोलकाता पोलिसांनी ही कारवाई आज (शुक्रवारी) केली. यासबंधिचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

हिंदी वेबसाईटच्या वृत्तानुसार, भाजपा युवा मोर्चाची पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याची महासचिव असलेली पामेला गोस्वामी हिच्या गाडीमध्ये पोलिसांना ड्रग्जचा साठा सापडला. पामेला यांना न्यू अलीपूर भागातून अटक करण्यात आली असून कारमध्ये लाखो रुपयांचे कोकीन ड्रिग्ज सापडले आहे. पामेला ही ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा भाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे न्यू अलीपूर भागात सापळा रचण्यात आला. तिची कार आली असता पोलिसांनी अडवून झडती घेतली. त्यावेळी तिच्या कारमध्ये आणि बॅगेत 100 ग्रॅम कोकीनचा साठा आढळला. त्यानंतर तिला अटक केली. तसेच तिचा जवळचा मित्र आणि भाजपचा नेता प्रोबिर कुमार डे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ज्यावेळी ही कारवाई केली त्यावेळी तिच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला केंद्रीय सुरक्षा दलाचा एक जवान उपस्थित होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.