‘त्या’ पंधरा मिनिटांनी माझ्या बाबांचा जीव घेतला : पूनम महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ज्या दिवशी बाबांवर हल्ला झाला त्या दिवशी बाबा माझ्या घरी येणार होते. मी बाबांना म्हणाले कि तुम्ही १५ मिनिटे उशिरा या. त्याच पंधरा मिनिटात बाबांवर गोळ्या झाडल्या गेल्या. म्हणून त्या पंधरा मिनिटासाठी मी स्वतःला आजही दोषी मानते कारण मी बाबांना १५ मिनिटे उशिरा या म्हणाले नसते तर बाबांवर तो प्रसंग  आलाच नसता असे पूनम महाजन म्हणाल्या आहेत.

पूनम महाजन एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्या कार्यक्रमात त्यांनी आपले दुःख बोलून दाखवले आहे. २२ एप्रिल २००६ रोजी प्रमोद महाजन यांच्या वर वरळी येथील ‘पूर्णा’ अपार्टमेंट मधील घरी त्यांच्या भावाने म्हणजे  विनोद  महाजन यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली परंतु ३ मे २००६ रोजी प्रमोद महाजन यांचे निधन झाले.

या प्रसंगाच्या दुःखद आठवणी पूनम महाजन यांनी या कार्यक्रमात जागवल्या आहेत. त्या दिवशी बाबा माझ्या घरी येणार होते. परंतु त्या दिवशी मी उशिरा उठले होती. त्या दिवशी माझ्या घरी सफाई साठी कोणीच नव्हते म्हणून मी बाबांना म्हणाले कि तुम्ही १५ मिनिटे उशिरा या आणि याच १५ मिनिटात बाबांवर गोळ्या झाडल्या गेल्या म्हणून मी आज ही या साठी स्वतःला दोषी मानते असे पूनम महाजन म्हणाल्या आहेत. या प्रसंगाच्या आठवणी सांगताना पूनम महाजन यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते.

प्रमोद महाजन यांना जेव्हा रुग्णालयात आणले तेव्हा तेथे पूनम महाजन होत्या तेव्हा त्यांना जखमी अवस्थेत  प्रमोद महाजन म्हणाले होते कि, मी असे काय वाईट केले आहे. हे सगळे मलाच बघायला मिळते आहे. मी कोणालाच सुखी ठेवू शकलो नाही. हा दुःखद प्रसंग सांगितल्यावर सर्व श्रोत्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या.

पंकजा मुंडे देखील या कार्यक्रमात उपस्थित होत्या त्यांनी हि त्यांच्या मामा म्हणजे प्रमोद महाजन यांच्या बद्दल एक आठवण सांगितली. पंकजा मुंडे यांच्या लग्नात त्यांना उखाणा येत नव्हता तेव्हा त्यांना उखाणा प्रमोद महाजन यांनीच सांगितला होता अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली आहे.