भाजप नेत्याचा प्रताप ; मंदिरात वाटल्या दारुच्या बाटल्या

लखनौ : वृत्तसंस्था – एका भाजपा नेत्याच्या मुलाने मंदिरामध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुच्या बाटल्यांचे वाटप केल्याचा प्रताप  समोर आला आहे. भाजपाचे नेते नरेश अग्रवाल यांनी सोमवारी पासी समाजासाठी श्रावण देवी मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी खाद्यपदार्थांच्या पाकिटात दारुच्या बाटल्या भरलेल्या होत्या. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला असून धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमादरम्यान नरेश अग्रवाल स्वतः उपस्थित होते.
उत्तर प्रदेशातील हरदोई येथील ही घटना आहे. भाजपाचे नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितिननं  या कार्यक्रमात खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये दारूच्या बाटल्या ठेवून उपस्थितांमध्ये वाटल्या. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले. या फोटोंमध्ये पुरीभाजीच्या बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या या फोटोमध्ये दिसत आहे.
नितीन अग्रवाल व्यासपीठावरुन खाद्य पदार्थांची पाकिटे गावाच्या प्रमुखाला देण्यात येतील. त्यांच्याकडून तुम्हाला ही पाकिटे मिळतील अशी घोषणा करताना दिसत आहेत. खाद्यपदार्थांच्या पाकिटाचे वाटप सुरु आहे तिथे गावच्या प्रमुखांनी जाऊन पाकिटे आपल्या ताब्यात घ्यावीत व सोबत आलेल्या लोकांना वाटप करावे असे अग्रवाल उपस्थितांना आवाहन करत होते. धक्कादायक बाब म्हणजे कार्यक्रमाला आलेल्या लहान मुलांना सुद्धा या पाकिटाचे वाटप करण्यात आले.
हरदोई येथील भाजपा खासदार अंशुल वर्मा यांनी खाद्यपदार्थांसह दारुचे वाटप केल्याबद्दल अग्रवाल यांच्यावर टीका केली. पक्षनेत्यांकडे आपण याची तक्रार करु. तसेच ही चूक सुधारण्यासाठी भाजपाला विचारविनिमय करावा लागणार आहे’, असे वर्मा यांनी सांगितले.
 कोण आहेत नरेश अग्रवाल –
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील रहिवासी असलेले नरेश अग्रवाल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या मुलानं अखिलेश सरकारमध्ये मंत्रिपद भूषवले आहे. ३८ वर्षांच्या राजकीय कारर्कीदीमध्ये नरेश अग्रवाल यांनी तब्बल चार वेळा पक्ष बदलले आहेत. नरेश अग्रवाल आधी समाजवादी पार्टीमध्ये होते. मार्च २०१८ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. खाद्यपदार्थांच्या पाकिटात दारुच्या बाटल्या वाटणारा  त्यांचा मुलगा नितीन आमदार आहे.