विधानसभा निवडणुका 370 कलमावर लढविण्याचा भाजपाचा ‘अजेंडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुका पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा निवडणुक मुद्दा बनवून साडेतीनशेहून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाने महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका या ३७० कलमावर लढविण्याचा अजेंडा राबविण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांची ३७० कलमावर व्याख्याने ठेवण्यास भाजपाच्या वतीने सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिक संघप्रणित संस्थांकडून यावर स्थानिक पातळीवरील नेत्यांचे कार्यक्रम छोट्या स्वरुपात शहरांमधून घेण्यात आले.

गेल्या आठवड्यात भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नड्डा यांचे ३७० कलम याविषयावर ठाण्यात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याला अपेक्षित अशी प्रसिद्धी मात्र सर्वत्र मिळाली नाही. त्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्ष आणि ३७० कलम रद्द करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे व्याख्यान रविवारी २२ सप्टेंबर रोजी गोरेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारच्या ५ वर्षाच्या कामगिरीऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी पुलवामा हल्ला आणि बालाकोटवर केलेला एअर स्ट्राईक यावरच प्रामुख्याने भर देऊन त्यावर मते मागितली होती. भारतीय मानसिकता ही नेहमीच पाकिस्तान विरोधी राहिली आहे. त्याचा फायदा उठवत मोदी यांनी संपूर्ण निवडणुक याच मुद्द्यांभोवती फिरत ठेवली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, हरियाना, झारखंड या तीन विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्नांची चर्चा होऊ देण्यापेक्षा ३७० कलम हा मुद्दा विधानसभेत करण्याचा भाजपा प्रयत्न असल्याची देऊन येत आहे.

Visit – policenama.com 

You might also like