काय सांगता ! होय, महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ अन् शिवसेनेनं दिला भाजपाला ‘पाठिंबा’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपला मित्र पक्ष असलेल्या भाजप सोबत काडीमोड केला होता आणि काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. यावेळी सत्तास्थापनेसाठी झालेली उलथा पालथ संपूर्ण राज्यानेच काय देशाने पाहिलेली आहे.

मात्र शिवसेनेचा भाजप सोबतचा घरोबा अद्याप तरी संपला नसल्याचे दिसून येत आहे. कारण नुकत्याच झालेल्या जळगाव महानगरपालिकेच्या महापौर निवडीमध्ये शिवसेनेच्या पाठींब्याने भाजपचा महापौर बिनविरोध निवडून आला आहे.

भाजपच्या सीमा भोळे यांनी आपला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होताच राजीनामा दिला होता. त्यामुळे लगेच महापौर निवडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारती सोनवणे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्याला शिवसेनेने बिनविरोध पाठींबा दिल्यामुळे पुन्हा भाजपचाच महापौर त्या ठिकाणी झाला.

यावेळी महानगर पालिकेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते तर महापौर पदी नियुक्ती होताच भारती सोनवणे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद साजरा केला.