Pooja Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा पुणे पोलिसांवर घणाघात, म्हणाल्या – ‘पोलीस निरीक्षक लगड हे अत्यंत बेजबाबदार अधिकारी’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव चर्चेत आल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी (दि. 25) पूजा चव्हाण यांनी आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक दीपक लगड यांच्याशी बाचाबाची झाली. पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. लगड हे अत्यंत बेजबाबदार अधिकारी आहे. पोलीस महासंचालक सुधा इतक्या संवेदनशील प्रकरणात बोलत नाहीत. त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीच वाघ यांनी केली आहे. तसेच आरोपी संजय राठोड याला वाचवण्यासाठी कुठल्या थरापर्यंत जाणार आहात, अशी टीकाही वाघ यांनी केली.

चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांवर घणाघाती आरोप केला. त्या म्हणाल्या की, पोलिस निरीक्षक दीपक लगड हे बेजबाबदार आहेत. त्यांना हे प्रकरण दाबण्यासाठी त्याठिकाणी बसवले आहे. त्यांचा कुणीतरी मोठा बाप आहे तिथे तो त्यांना सांगत असावा तू घाबरु नको. पोलीस निरीक्षक सागत आहेत की गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाहीत. पण पूजा चव्हाणसोबत तिकडे राहणाऱ्या दोन जणांचे काय ते पोलिसांच्या ताब्यात का नाहीत, असा सवाल वाघ यांनी केला आहे. आई वडिलांची तक्रार नाही म्हणून गुन्हा दाखल होत नाही. मग त्या 12 ऑडिओ क्लिपच्या चौकशी केले त्याचे काय झाले, असेही वाघ म्हणाल्या.