भाजपाचा पलटवार ! केशव उपाध्ये म्हणाले – ‘राऊत साहेब, डोळे उघडा…किती यादी सांगू?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याचा समाचार घेतला. ‘राऊतसाहेब, डोळे उघडा…देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला. त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कसं विसरून चालेल?, असा टोला लगावला आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करून यावर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘हा देश रामभरोसे चालत आहे. संजय राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे’.

तसेच त्यांनी पुढे म्हटले, की ‘राऊतसाहेब, डोळे उघडा…देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कसं विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत…किती यादी सांगू?

काय म्हणाले होते संजय राऊत?

प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथेही ऑक्सिजनअभावी लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे पंतप्रधान, गृहमंत्री, आरोग्यमंत्री, सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अहंकार आणि राजकारण विसरुन एकमेकांशी चर्चा करत एकत्र काम केले तरच देशातील स्थिती सुधारु शकते. पंतप्रधान, केंद्र सरकार जागेवरच आहे, पण त्यांचे अस्तित्व दिसणं महत्त्वाचं आहे. अदृश्यपणे काम करुन चालणार नाही. हा देश सध्या संकटाच्या काळात फक्त रामभरोसे पद्धतीने सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.