अखेर ठरलं ! विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी प्रविण दरेकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मागील काही दिवसांपासून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती. काही नेते दबावतंत्र वापरत असल्याची चर्चा होती. काही ज्येष्ठ नेत्यांची नावेही चर्चेत होती. अखेर या पदावर दरेकर यांची वर्णी लागली आहे.

भाजपचे प्रवक्ते असलेले प्रविण दरेकर हे मुंबईच्या मागाठणे मतदारसंघातून विधानपरिषद आमदार आहेत. प्रथमच विधानपरिषदेवर निवडून गेलेल्या दरेकरांना आता विरोधी पक्षनेतेपदाची मोठी जबाबदारी भाजपाने दिली आहे. विशेष म्हणजे विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर या दिग्गजांची नावे आघाडीवर असताना दरेकर यांनी त्यांना मागे टाकत विरोधीपक्षनेतेपद मिळवले आहे. दरेकर हे २००९ ते २०१४ पर्यंत आमदार होते. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला होता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/