रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ व्हिडिओबाबत भाजपचे स्पष्टीकरण

शहीद जवानांचा अतिरेकी म्हणून केला होता उल्लेख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापुरातील भाजप-शिवसेना युतीच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना रावसाहेब दानवे यांनी पुलवामा हल्ल्याचा संदर्भ देताना जवानांऐवजी अतिरेकी असा उल्लेख केला. दानवे म्हणाले की, ‘पाकिस्तानने आपले ४० अतिरेकी मारले. त्यामुळे देशात प्रचंड रोष तयार झाला.’ या वक्तव्यामुळे आता दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हायरल झालेला व्हिडिओ बनावट असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रावसाहेब दानवेंचा तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामध्ये हेच का भाजपाचे ब्रिगेडी देशप्रेम ? असे म्हटले आहे. तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांनाच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी अतिरेकी ठरवले, असा आरोप राष्ट्रवादीने केला. राष्ट्रवादी काँग्रेसने टि्वट केलेल्या पुलवामाचा संदर्भ असलेल्या त्या व्हिडिओबद्दल भाजपाने पत्रककाढून स्पष्टीकरण दिलं आहे.

तीन दिवसांमध्ये आपल्या सैन्याने पाकिस्तानात जाऊन आपल्या जवानांनी त्या ठिकाणी चारशे अतिरेकी मारले आणि हे दाखवून दिले की, आमचे सैनिक हे काही कमी नाही हे दानवेंचे मूळ वक्तव्य आहे. पण बोलताना घेतलेल्या पॉजचा दुरुपयोग करुन बनावट व्हिडिओ तयार करुन बदनामीचा प्रयत्न करण्यात आला असा भाजपाने दावा केला आहे.

प्रसिद्धीमाध्यमांनी या व्हिडिओबाबत शहानिशा करावी आणि बनावट व्हिडिओ तयार करुन बदनामी करण्याच्या कारस्थानाला बळी पडू नये असे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.