भाजपच्या सभेचा फज्जा ! फलकावर 7, स्टेजवर 5 नेते अन् समोर एकच, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात केरळ, आसाम, पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूका होण्याची शक्यता आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर इच्छूक उमेदवार, पक्षाचे कार्यकर्ते, नेते मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. नेत्यांच्या सभा, बैठका, कार्यक्रम, मतदारसंघात विविध उपक्रम राबवले जात आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाने या निवडणूकांसाठी कंबर कसली असून सभा घेऊन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच एका भाजपच्या फ्लॉप सभेचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनीही हे छायाचित्र ट्विट केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये होत असलेली निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केल्याने या ठिकाणची निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सरळ लढत होणार आहे. भाजप सत्ता खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर तृणमूल काँग्रेस सत्ता आपल्याकडेच ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. ठिकठिकाणी सभा, विविध कार्यक्रम घेतले जात आहे. याशिवाय राज्यात परिवर्तन यात्राही काढण्यात आली. सोशल मिडियावर व्हायरल झालेला फोटो पश्चिम बंगालमधीलच असल्याचे बोलले जात आहे.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, एका मोठ्या मैदानावर भाजपची सभा सुरु असल्याचे दिसते. सभेच्या स्टेजवर पाच नेते दिसत आहेत. तर मागील फलकावर सहा ते सात नेत्यांचे छायाचित्र आहे. स्टेजच्या समोरही काही मोजक्याच खुर्च्या आहेत. पण केवळ एकच व्यक्ती समोर बसल्याचे दिसत आहे. त्याच्यासमोर एका वक्त्याचे भाषण सुरु असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी हे छायाचित्र ट्विट केले आहे. त्यासाठी त्यांनी #PThepartylsOver हा हॅशटॅग वापरला आहे. तसेच स्टेजवर पाच लोक, चित्रात सात नेते, प्रेक्षकांमध्ये एक व्यक्ती. आणि हे केरळमध्येही नाही, अशी टॅगलाईन दिली आहे. या ट्विटला अनेकांनी लाईक करुन शेअर केले आहेत. याशिवाय शशी थरुर यांनी विविध छायाचित्र, व्हिडीओ टाकून फिरकी घेतली आहे.