भाजपचे भविष्य ‘या’ १३ राज्यातील ३५३ जागांवर अवलंबून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपने १३ राज्यातील ३५३ जागांवर खास लक्ष केंद्रीत केले आहे. या राज्यांमध्ये २०१४ च्या यशाची पुनरावृत्ती झाली तर केंद्रात आपला गढ राखणे भाजपला सोपे जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचा दावा करीत आहेत. मात्र, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. या तेरा राज्यांत भाजपने यश मिळवले तर भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. २०१४ मध्ये भाजपने या राज्यांतील ७४ टक्के जागांवर विजय मिळविला होता. राजकीय विश्‍लेषकांनुसार १३ राज्यांची तीन भागात विभागणी केली जावू शकते.

पहिल्या श्रेणीत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि झारखंडचा समावेश केलेला आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने येथे १६२ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या राज्यात त्याच जागा पुन्हा राखणे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे. महाराष्ट्र सोडला तर भाजपने इतर राज्यात स्वबळावर निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसने महाराष्ट्र, गुजरात आणि झारखंडमध्ये आघाडी केली होती.

दुसऱ्या श्रेणीत उत्तरप्रदेश, बिहार आणि कर्नाटक ही तीन राज्ये आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने येथे १४८ पैकी १२१ जागांवर विजय मिळवला होता. यात उत्तरप्रदेश मध्ये भाजपने सगळ्यात जास्त म्हणजे ८० पैकी ७१ जागांवर विजय मिळवला होता. तिसऱ्या श्रेणीत पश्‍चिम बंगाल आणि ओडिशा या दोन राज्यांना ठेवण्यात आले आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला या दोन्ही राज्यांमधील ६३ पैकी फक्त तीन जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत दोन्ही राज्यांतील मतदार आपल्या झोळीत भरभरून मतदान करणार असल्याचा विश्वास भाजपला आहे. भाजपने सुध्दा या सर्व जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आता या राज्यांत भाजपला किती मोठे यश मिळणार हे २३ मे रोजीच समजेल.