Pune News : भाजपच्या हेमंत रासने यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ‘हॅटट्रिक’ तर शिक्षण समिती अध्यक्षपदी मंजुश्री संदीप खर्डेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हातीच पुन्हा एकदा महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने रासने यांच्यावर विश्वास दाखवला असून महापालिकेच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष होणारे हेमंत रासने हे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.

पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदी भाजपच्या मंजुश्री संदीप खर्डेकर तर उपाध्यक्षपदी कालिंदा मुरलीधर पुंडे यांचा विजय झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादीने माघार न घेतल्याने भाजपच्या निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. यावेळी राष्ट्रवादी कडून ऐनवेळी माघार घेतली जाईल असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. यामध्ये भाजपच्या खर्डेकर यांना 8 तर विरोधकांना 4 मते मिळाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांना मतदान करता आले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड तर शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी सुमन पठारे यांचे अर्ज दाखल केले. तर शिक्षण समितीच्या उपाध्यपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये यासाठी भाजपने व्हिप जारी केला होता. या व्हिपची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मंजुश्री खर्डेकर आणि कालिंदा पुंडे यांनी सोमवारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.

सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर हेमंत रासने यांनी सांगितले की, शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यामध्ये यश आले नाही. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून सलग तिसऱ्यांदा माझ्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. महापालिकेच्या इतिहासात अशी संधी केवळ मलाच मिळाली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती विरोधकांना केली होती. मात्र, यात यश आले नाही. परंतु येत्या वर्षात महापालिकेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रासने यांनी सांगितले.